डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

वडीलासुरा येथे बुद्ध-आंबेडकर-रमाई मूर्तींचे अनावरण

Published By Shubh Prabhat
On

जालना : अंबड तालुक्यातील वडीलासुरा येथे आज सिद्धार्थ बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट होते, तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नारायणराव कुचे उपस्थित होते. पूज्य भंते राजरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व, सामाजिक समता व शिक्षणाचे मूल्य सांगत, मंत्री संजय शिरसाट म्हणाले, महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध विकासाची कामे जोमाने सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्पित कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, याची मी ग्वाही देतो.
आमदार नारायण कुचे म्हणाले की, वडीलासुरा येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या माध्यमातून समता, बंधुता व न्यायाचे विचार समाजात अधिक दृढ होण्यास मदत होईल. तसेच भावी पिढीला प्रेरणा मिळेल.
याप्रसंगी कार्यक्रमास नंदकुमार घोडेले, प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर, माजी सभापती रमेश पैठणे, कपिल सरोदे, साहेबराव पटेकर, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष पटेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अर्जुन पटेकर यांनी केले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज