सिड्स कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगत शेतकर्‍याच्या बियाण्यांची जबरी चोरी; दोन आरोपी जेरबंद, 21 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत 21 लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Published By Shubh Prabhat
On

नामांकित सिड्स कंपनीचा प्रोडक्शन मॅनेजर असल्याचे भासवून कर्नाटकातील शेतकर्‍याला जाळ्यात ओढत त्याच्या झेंडू फुलांच्या बियाण्यांची जबरी चोरी करणार्‍या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत जेरबंद केले. या कारवाईत 21 लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी लोकेश देवेंद्रप्पा इलेगर रा. बिर्नओप्पा, ता. ब्याडगी, जि. हावेरी, कर्नाटक यांना 18 एप्रिल रोजी जालना येथे दोन अनोळखी इसमांनी झेंडू फुलांचे बियाणे खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलावले. आरोपींनी स्वतःला नामांकित सिड्स कंपनीतील प्रोडक्शन मॅनेजर असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीकडील 17 किलो 700 ग्रॅम वजनाचे सुमारे 7 लाख 78 हजार 800 रुपयांचे बियाणे घेतले.

यानंतर आरोपींनी फिर्यादीस मोटारसायकलवर बसवून काही अंतरावर नेले आणि अचानक त्याला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर बियाण्यांची जबरी चोरी करून ते फरार झाले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Indian_Fast

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करुन गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला कन्हैयानगर येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. यावेळी सुनिल बाबासाहेब जगताप (वय 19) व वैभव पांडुरंग जगताप (वय 23, दोघेही रा. निवडुंगा, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले बियाणे, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कार आणि मोबाईल फोन असा एकूण 21 लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस कर्मचारी सागर बाविस्कर, इरशाद पटेल, देविदास भोजने, आक्रूर धांडगे, सौरभ मुळे यांच्या पथकाने केली.

प्रतिनिधी

टॉप न्यूज