जालन्यात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरा खून; कैलास पवार मयताचे नाव; दरेगाव शिवारातील जंगलात मृतदेह आढळला
या भागातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा एकाच आठवड्यातील दुसरा खून
Published By Shubh Prabhat
On
जालना शहरातील इंदेवाडी पाण्याची टाकी परिसरात वास्तव्यास असलेल्या कैलास दत्तू पवार यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील दरेगाव शिवारातील वनविभागाच्या जंगलात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा एकाच आठवड्यातील दुसरा खून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास पवार हे 17 एप्रिलपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असताना अखेर दरेगाव शिवारातील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने ही हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तसेच, पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप मयत कैलास पवार यांच्या मुलीने आणि नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे. मात्र, पिडीताच्या कुटुंबाने केलेल्या आरोपामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


