न्याय मिळवायचा असेल तर... ''चळवळ, वृत्तपत्र आणि आपला आवाज'' हा लेख नक्की वाचा

फक्त आंदोलन करून किंवा घोषणा देऊन समाज बदलत नाही

Published By Shubh Prabhat
On

भारतीय समाजाच्या इतिहासात अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि पददलित समाजासाठी संघर्ष केला. त्यांना माहीत होते की, फक्त आंदोलन करून किंवा घोषणा देऊन समाज बदलत नाही. समाज बदलण्यासाठी विचार पोहोचवावे लागतात, लोकांना जागं करावं लागतं आणि सत्य सर्वांसमोर आणावं लागतं. आणि हे काम सर्वात प्रभावीपणे करू शकतं ते म्हणजे वृत्तपत्र.

डॉ. आंबेडकरांनी म्हणूनच मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. त्या काळात ज्यांना बोलण्याचा हक्क नव्हता, ज्यांच्या वेदना कुणी ऐकत नव्हतं, ज्यांच्यावर अन्याय होत होता पण तो कुठेच दिसत नव्हता, अशा लोकांसाठी ही वृत्तपत्रे आशेचा किरण होती. या वृत्तपत्रांनी हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली. त्यांनी लोकांना विचार करायला शिकवलं, प्रश्न विचारायला शिकवलं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवलं.

212121

Indian_Fast

आज आपण वेगळ्या काळात जगतो. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे, हजारो न्यूज चॅनल्स आहेत. पण तरीही एक प्रश्न मनात येतो, की खरंच आपला आवाज कुठे ऐकला जातो का? आपल्या गावात घडलेली घटना, आपल्या घरातील अडचण, आपल्या समाजावर झालेला अन्याय, हे सगळं मोठ्या माध्यमांपर्यंत पोहोचतं का? की ते सगळं कुठेतरी हरवून जातं?

आज अनेक वृत्तपत्रे आणि माध्यमे जाहिरातींवर चालतात. ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचाच आवाज मोठा होतो. जाहिरात देणार्‍यांच्या बातम्या मोठ्या होतात, पण सामान्य माणसाच्या समस्या लहान होतात किंवा दिसतच नाहीत. तुमचं दु:ख, तुमची वेदना, तुमचा संघर्ष, हे सगळं अनेकदा पानाच्या कोपर्‍यातही येत नाही. कारण त्यामध्ये पैसा नसतो.

2020

हळूहळू अशी परिस्थिती निर्माण होत आहे की, सामान्य माणूस एकटा पडतो आहे. तो बोलतो, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. तो न्याय मागतो, पण त्याची दखल घेतली जात नाही. कारण त्याच्याकडे मोठी ताकद नाही, पैसा नाही, आणि त्याचा आवाज पोहोचवणारे माध्यमही कमी होत चालले आहेत.

जर अशीच परिस्थिती राहिली, तर एक दिवस असा येईल की आपल्या समस्या, आपल्या वेदना, आपल्या भावना या सगळ्यांना कुठेच जागा उरणार नाही. लोकशाही फक्त कागदावर उरेल, पण प्रत्यक्षात सामान्य माणसाचा आवाज कुणी ऐकणार नाही.

21

म्हणूनच आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपल्या साठी बोलणारे, आपल्या समस्यांना जागा देणारे, आपल्या हक्कासाठी उभे राहणारे वृत्तपत्र कोणते आहे? जे आपल्या अडचणी समजून घेतं, जे आपल्या वेदनांना शब्द देतं, जे अन्यायाविरुद्ध उभं राहतं, तेच खरं आपलं माध्यम आहे.

अशा वृत्तपत्रांना आपण जिवंत ठेवले पाहिजे. फक्त वाचून नाही, तर त्यांना आधार देऊन, त्यांना साथ देऊन, त्यांच्यावर विश्वास ठेवून. कारण ते जिवंत राहिले, तरच आपला आवाज जिवंत राहील. ते बंद पडले, तर आपला आवाजही हरवेल.

आंबेडकरी समाजाने आणि सर्व वंचित घटकांनी याची विशेष जाणीव ठेवली पाहिजे. कारण हा समाज नेहमीच संघर्ष करत आला आहे. या समाजाला आपला आवाज मिळवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. तो आवाज जपणं ही आपली जबाबदारी आहे.

22

जर आपणच आपल्या आवाजाला साथ दिली नाही, तर दुसरं कुणीही आपल्यासाठी उभं राहणार नाही. मग आपण कितीही ओरडलो, कितीही प्रयत्न केले, तरी आपला आवाज कुठेतरी हरवून जाईल.

आज वेळ आली आहे जागं होण्याची. योग्य ते ओळखण्याची. आपल्या हक्कासाठी उभं राहण्याची. आणि आपल्या आवाजाला जिवंत ठेवणार्‍या वृत्तपत्रांच्या पाठीशी उभं राहण्याची.

कारण शेवटी एकच सत्य आहे, की जर आपला आवाज जिवंत राहिला, तरच आपला अस्तित्व जिवंत राहील. आणि जर तो आवाजच हरवला, तर आपल्या अस्तित्वालाही कुणी ओळखणार नाही.

- अच्युत द. मोरे
मो. नं. 9850516724

प्रतिनिधी

टॉप न्यूज