मंठा रोडवर दिवसा ढवळ्या मुलीं आणि महिलांची छेड; तालुका पोलीसांना माहिती देऊनही कारवाई नाही

पोलीसांना माहिती देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप

Published By Shubh Prabhat
On

जालना तालुक्यातील देवमुर्ती शिवारातील मंठा रोडवर मुली आणि महिलांची दिवसा ढवळ्या छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याबाबत पोलीसांना माहिती देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांमुळे पोलीसांची गुन्हेगारांना मुक संमती आहे की काय असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंठा रोडवरील चौधरी नगर परिसरात एक इसम कार वॉशिंगसाठी वापरल्या जाणार्‍या पंपाने मुख्य रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांवर पाणी उडवत होता. दरम्यान, स्कुटीवरून प्रवास करणार्‍या दोन मुलींवर त्याने मुद्दाम पाणी मारल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मुलींना त्रास सहन करावा लागला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संबंधित इसमाला समजावण्याचा प्रयत्न केला. भरधाव वाहनांवर अचानक हाय स्पीड पंपाने पाणी मारल्यास अपघात होऊ शकतो, असे सांगून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या इसमाने उद्धटपणे ‘मी करणारच, थांबणार नाही’ असे म्हणत नागरिकांनाच उलट सुनावले.

या प्रकाराची माहिती देण्यासाठी नागरिकांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर संबंधित बीटचे पीएसआय पवार यांनाही संपर्क करण्यात आला, परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ही बाब पोलीसांच्या गुप्त शाखेला कळविण्यात आली. त्यानंतर बीट अंमलदार येतील अशी माहिती देण्यात आली, मात्र पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही.

Indian_Fast

या घटनेनंतर संबंधित मुली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याच्या तयारीत होत्या. मात्र, रोज त्याच रस्त्यावरून ये-जा करावी लागत असल्याने आणि भीतीच्या वातावरणामुळे त्यांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली. पोलीसांना माहिती असूनही कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मंठा रोडवरील या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज