दुधना नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; मौजपुरी पोलिसांची कारवाई, 5 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published By Shubh Prabhat
On

जालना तालुक्यातील घेटुळी शिवारातील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर मौजपुरी पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मौजपुरी पोलिसांकडून माहिती संकलन सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घेटुळी शिवारातील दुधना नदीपात्रातून एक ट्रॅक्टर वाळूची अवैध वाहतूक करत आहे.

या खात्रीलायक माहितीनंतर सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाहणी केली असता एक लाल रंगाचे विनाक्रमांक ट्रॅक्टर ट्रॉलीसह दिसून आले. पोलिसांना पाहताच चालकाने ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून जालना-मंठा महामार्गावरील बाबुलतारा पाटी येथे ट्रॅक्टर पकडले.

Indian_Fast

पंचासमक्ष तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली आढळून आली. यावेळी चालक संदीप रामप्रसाद शेळके (रा. पाहेगाव, ता. जि. जालना) याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी पावतीची मागणी केली असता त्याने ती नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करून मौजपुरी पोलीस ठाण्यात जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, चंद्रकांत पवार, दादासाहेब हरणे, नितीन खरात, प्रदीप पाचरणे, प्रशांत म्हस्के, कैलास शिवणकर, सदाशिव खैरे, धोंडीराम वाघमारे यांच्या पथकाने केली.

प्रतिनिधी

टॉप न्यूज