जलसंधारण विभागात बोगस कामांचा संशय; दुरुस्त्या दाखवून बिले हडप केल्याचा आरोप

या दुरुस्त्यांच्या नावाखाली संबंधित ठेकेदारांनी बिले सादर करून निधी उचलल्याचे समजते.

Published By Shubh Prabhat
On

जालना : जालना जिल्ह्यातील जलसंधारण विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा संशयाची छाया निर्माण झाली असून, दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवून बिले हडप केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा जलसंधारण अधिकार्‍यांच्या अखत्यारीत येणार्‍या विविध कामांमध्ये प्रत्यक्षात काम न करता किंवा अत्यल्प काम करून मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या दाखवण्यात आल्या. या दुरुस्त्यांच्या नावाखाली संबंधित ठेकेदारांनी बिले सादर करून निधी उचलल्याचे समजते. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता कामे अपूर्ण किंवा अस्तित्वात नसल्याचेही निदर्शनास आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, उन्हाळ्यात करण्यात येणार्‍या नाला खोलीकरण, गाळ काढणे, बंधार्‍यांची दुरुस्ती, जलस्रोतांचे पुनर्भरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्येही अनियमितता झाल्याचा आरोप आहे. कागदावर मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण दाखवली जात असताना प्रत्यक्षात मात्र पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Indian_Fast

या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व कामांचे तातडीने स्वतंत्र आणि निष्पक्ष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बोगस कामे दाखवून बिले हडप करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, जिल्हा जलसंधारण अधिकार्‍यांच्या अखत्यारीत असेेलेल्या कामात शेततळी निर्माण व दुरुस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरण, मृद व जलसंधारण कामे, बंधार्‍यांची उभारणी व दुरुस्ती, जलसाठा वाढविण्यासाठी प्रकल्प, तसेच पावसाच्या पाण्याचे साठवण व व्यवस्थापन. उन्हाळ्यात विशेषतः गाळ काढणे, नाले साफसफाई, बंधार्‍यांची दुरुस्ती आणि जलस्रोतांचे पुनर्भरण ही कामे प्राधान्याने केली जाणे अपेक्षित असते.

मात्र, या कामांमध्येच अनियमितता होत असल्याच्या आरोपांमुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरत असताना, अशा प्रकारच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज