कर्मकांडांना फाटा देत ग्रामगीतेच्या पठणातून गृहप्रवेश; परतूरमध्ये आगळावेगळा उपक्रम

घर बांधकामासाठी योगदान देणार्‍या मिस्त्री आणि कामगारांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Published By Shubh Prabhat
On

परतूर, दि. 19 एप्रिल: परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव रमाकांत बरिदे यांनी नव्याने बांधलेल्या घराच्या गृहप्रवेशासाठी पारंपरिक कर्मकांडांना फाटा देत ग्रामगीतेचे पठण करून एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला.

नूतन घराच्या प्रवेशप्रसंगी भारतीय संविधान, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम, डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच विविध संतांच्या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रेरणा ज्ञानेश्वर बरिदे यांनी ग्रामगीतेचे पठण करून कार्यक्रमाला वेगळे स्वरूप दिले.

या कार्यक्रमात घर बांधकामासाठी योगदान देणार्‍या मिस्त्री आणि कामगारांचा विशेष सन्मान करण्यात आला. अफजल खान, असलम खान, लालू भाभी आणि जावेद भाई यांचा ड्रेस देऊन सत्कार करण्यात आला.

Indian_Fast

कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य मधुकर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा उपाध्यक्ष संजय हेरकर, परतूर शाखेचे एकनाथ कदम, कल्याण बागल यांच्यासह डी. वाय. काटे, अनिल पुरी, लक्ष्मण पवार, महारुद्र स्वामी तसेच बरीदे कुटुंबीय आणि इतर आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांना ग्रंथरूपी पुस्तके भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज