रोजगार हमी योजनेत गैरप्रकारांचे आरोप; गरजू मजुरांपासून रोजगार दूर
प्रत्यक्ष मजुरांऐवजी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे सांगितले जाते.
Published By Shubh Prabhat
On
जालना - ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे आरोप पुढे येत आहेत. यंत्रांच्या वापरामुळे प्रत्यक्ष मजुरांना काम मिळत नसून, बनावट नावे दाखवून निधी अपहार होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जलसंधारण, शेती विकास, ग्रामीण पायाभूत सुविधा, वृक्षलागवड तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध कामांसाठी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध होत आहे. शेततळे, नाला खोलकरण, बंधारे बांधकाम, माती रस्ते, स्मशानभूमी विकास, अंगणवाडी परिसर सुधारणा अशा अनेक कामांचा समावेश आहे. मात्र या कामांमध्ये प्रत्यक्ष मजुरांऐवजी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, काही गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्या संगनमताने ठरावीक कामे काढून त्यातून निधी अपहार केल्याचेही आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोजगार हमी योजनेचा उद्देश ग्रामीण बेरोजगारांना वर्षातून किमान 100 दिवसांचा रोजगार देणे, गावांचा विकास साधणे आणि जलसंधारणाद्वारे शेती उत्पादन वाढवणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात या उद्दिष्टांपासून योजना दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गरजू मजुरांना न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


