समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 महिला मजुरांचा मृत्यू, 4 जखमी

नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली.

Published By Shubh Prabhat
On

जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. कडवंची शिवारात घडलेल्या या भीषण अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश आणि हाहाकार माजला होता.

अपघाताची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, स्थानिक नागरिकांनीही तत्परतेने मदतकार्य करत जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवले.

Indian_Fast

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये प्रयागबाई बाबासाहेब वाघ (वय 30, फ्रॅक्चर), कविता विठ्ठल चौधरी (वय 35, डोक्याला दुखापत), दिनेश रंगनाथ गायकवाड (वय 42, डोक्याला दुखापत) आणि एक अज्ञात महिला (वय अंदाजे 50, डोक्याला दुखापत) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (वय 45, निधोना), लक्ष्मीबाई संतोष मदन (वय 35, केळीगव्हाण), मीना परमेश्वर आदमाने (वय 45, निधोना), कांचनबाई प्रकाश आदमाने (वय 50, निधोना), ताराबाई गहेणाजी चौधरी (वय 60, केळीगव्हाण), कडूबाई रामदास मदन (वय 55, केळीगव्हाण) आणि सुमनबाई कचरू आदमाने (वय 70, निधोना) यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले असून त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणार्‍या मजुरांसाठी पुरेशा सुरक्षाव्यवस्था आणि खबरदारी घेतली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, या घटनेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच प्रशासनाकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज