जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; चंदनझीरा येथील चार वर्षीय बालकावर हल्ला

चंदनझिरा येथील पंचशील नगर भागात चार वर्षीय गौरव सुहास खरात या बालकावर हल्ला

Published By Shubh Prabhat
On

जालना शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चंदनझिरा येथील पंचशील नगर भागात चार वर्षीय गौरव सुहास खरात या बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.  या घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून, कुत्रा घटनास्थळावरून पसार झाला. गेल्या काही महिन्यापुर्वी दोन मुलींचा कुत्र्यांनी बळी घेतला होता. आता पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्याचा प्रश्न एैरणीवर आला आहे. 

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, जालना महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि नागरिकांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

नागरिकांच्या मते, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवण्यात येणार्‍या अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल  कार्यक्रम, लसीकरण मोहीम आणि पकड-नसबंदी उपक्रम यांची केवळ घोषणा केली जाते; प्रत्यक्षात मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Indian_Fast

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहीम प्रभावीपणे राबवावी तसेच शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज