सर्वांना सोबत घेऊन तणावमुक्त वातावरणात काम करणार - सीईओ कृष्णकांत कनवारिया यांचा मनोदय
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले उपस्थित होते.
Published By Shubh Prabhat
On
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व अधिकारी व कर्मचार्यांना सोबत घेऊन तणावमुक्त वातावरणात करण्यात येईल, असा मनोदय जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी व्यक्त केला.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या जागी कृष्णकांत कनवारिया यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेट देऊन कामकाज व कर्मचारी यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.
तसेच, अधिकारी व कर्मचार्यांवर अनावश्यक तणाव येऊ नये यासाठी कामाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व सुसंवाद यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तणावमुक्त वातावरणात काम केल्यास कार्यक्षमता वाढते आणि नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देता येतात, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत असल्याची माहिती दिली. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने व समन्वयाने काम करून जिल्ह्याला विविध योजनांमध्ये अग्रक्रमांक मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अभियान, महिला व बाल कल्याण विभाग, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आदींसह सर्वच विभागांमध्ये अधिक जोमाने काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले उपस्थित होते.


