घनसावंगीतील थरारक घटना; दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या बापाची मुलानेच केली कुर्‍हाडीने हत्या

मृतदेहावर कुर्‍हाडीने वार केल्याच्या खुणा आढळून आल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले.

Published By Shubh Prabhat
On

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रुई गावात पोटच्या मुलानेच बापाची कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मुलगा आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (वय 45) यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहावर कुर्‍हाडीने वार केल्याच्या खुणा आढळून आल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप राजगुरू यांचा मुलगा विलास राजगुरू (वय 19) याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, त्यामध्ये मुलाने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

Indian_Fast

दरम्यान, दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे काही काळापूर्वी विषबाधेमुळे निधन झाले होते. त्यानंतर दिलीप हे दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होते आणि आजच त्यांचा विवाह होणार असल्याची माहिती आहे. याच कारणावरून रागाच्या भरात मुलाने बापाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विवाहाच्या दिवशीच दिलीप राजगुरू यांचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास तीर्थपुरी पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी

टॉप न्यूज