स्त्रीचे शौर्य, विद्वत्ता आणि अधिकार मान्य केल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही - अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण

Published By Shubh Prabhat
On

स्त्रीचे शौर्य, विद्वत्ता आणि तिचे अधिकार मान्य करणे हाच खर्‍या अर्थाने महिला दिनाचा उद्देश आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही समान असून त्यांच्या कष्टांचा आणि कमाईचा हक्कही समान असायला हवा. हे समाजाने स्वीकारले तरच प्रगतीचा गाडा पुढे जाईल, असे प्रतिपादन जालना येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय स्त्रियांचे आरोग्य, आव्हाने व उपाययोजना या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर, हडको (छत्रपती संभाजीनगर) येथे रविवारी दि. 8 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले होते.

या परिषदेचे उद्घाटन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अनिल खामकर आणि परिषदेचे अध्यक्ष जे. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून महादेव डोगरे, शकुंतला देसरडा, वसुधा पिंगळे, डॉ. सविता बहिरट, शरद टाकळकर, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, चंद्रकांत ठोकणे आणि अशोक शिरसे यांनी आपले विचार मांडले.

Indian_Fast

यावेळी बोलताना अ‍ॅड. चव्हाण म्हणाले की, महिलांना पुढे जाण्यासाठी घरातून पाठबळ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. महिलेला तिच्या सासूने आणि पतीने साथ दिली पाहिजे तसे वातावरण निर्माण झाले तरच महिला दिनाचे खरे महत्त्व समाजाला समजेल. आजच्या प्रत्येक मुलीने शिक्षण आणि कर्तृत्वाच्या जोरावर प्रगती साधली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच महिलांमध्ये मोठी क्रांतिकारी शक्ती असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समानता आणि स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे महिलांनी या अधिकारांचा योग्य उपयोग करून समाजाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

परिषदेत भारतीय महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यावर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महिलांची उपस्थिती होती.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज