जिल्ह्यात इंधन साठा पुरेसा; अफवांमुळे वाढली मागणी वाढल्याने पंप लवकर बंद - जिल्हाधिकार्यांचे नागरिकांना आवाहन
प्रत्यक्षात टंचाईमुळे नसून वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Published By Shubh Prabhat
On
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईची कोणतीही समस्या नसून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जिल्हा पुरवठा अधिकार्यांच्या खुलाशानंतर त्यांनी ही भूमिका मांडत नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून साठा मुबलक आहे. मात्र, काही अफवा आणि भीतीमुळे नागरिकांकडून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी केली जात आहे. यामुळे पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढत असून, दिवसभर चालणारे पंप अवघ्या चार तासांतच इंधन संपल्याने बंद पडत आहेत.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. इंधनाची साठेबाजी करू नका. फक्त आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा. यामुळे सर्वांना पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.
याशिवाय, इंधन खरेदी-विक्रीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नसून पुरवठा यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांतता व संयम राखल्यास ही परिस्थिती लवकर सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


