जालन्यात स्वाधार योजनेत बनावट कागदपत्रांचा प्रकार; विद्यार्थ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश

शासकीय योजनांचा गैरवापर मानला जात असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

Published By Shubh Prabhat
On

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करताना काही विद्यार्थ्यांनी बनावट किंवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे.  या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांना मेल व पत्राद्वारे नोटिसा पाठवण्यात आल्या असून दोन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी बनावट मार्क मेमो आणि इतर कागदपत्रे अपलोड करून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शासकीय योजनांचा गैरवापर मानला जात असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

https://www.instagram.com/reel/DWUDctEiN7x/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Indian_Fast

शासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी खोटी, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केली असतील, त्यांचा अर्ज तत्काळ अपात्र ठरवण्यात येईल. तसेच योजनेतून मिळालेला आर्थिक लाभ परत वसूल करण्यात येईल. गरज भासल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे. याशिवाय भविष्यातील शासकीय योजनांपासूनही वंचित ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्याकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे तपासून पाहावीत आणि चुकून किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली असल्यास तात्काळ खुलासा सादर करून आवश्यक दुरुस्ती करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा प्रामाणिकपणे लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी

टॉप न्यूज