जालन्याच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे; उपमहापौरपदी राजेश राऊत यांनी स्वीकारला पदभार
अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
महानगरपालिकेत पार पडलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेत अधिकृतरीत्या निवडीची घोषणा करण्यात आली. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी कामकाज पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर वंदना मगरे यांनी जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला, तर राजेश राऊत यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यात आले.
या विशेष सर्वसाधारण सभेला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर आबा दानवे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड आणि उपमहापौरपदी राजेश राऊत यांचा पदभार स्वीकारल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


