मुख्यमंत्र्यांचा आदेश; रुपाली चाकणकरांचा राजीनामा

विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत असून राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.

Published By Shubh Prabhat
On

मुंबई- अशोक खरात प्रकरणात वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्याच्यासोबतचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होत असून राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.

या वाढत्या दबावामुळे रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

Indian_Fast

रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे या पदावर आता नवीन नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच चाकणकर यांचा या प्रकरणात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नार्को टेस्ट करण्याची मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

याआधी रुपाली चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. मात्र, वाढत्या आरोपांमुळे त्यांनी अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी, रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला गेला, याचे आम्ही स्वागत करतो. महिला नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता, मात्र तो झाला नाही, असे म्हटले.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आपण सामाजिक कार्य करत असताना अशोक खरात यांच्या ट्रस्टमध्ये सहभागी झालो होतो, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी

टॉप न्यूज