नववर्षानिमित्त मौजपुरी येथील यात्रेत कुस्त्यांची भव्य दंगल; रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

मंदिरात अंबील वाटप करण्यात येते आणि श्रद्धेने बसविलेल्या काठ्यांची पूजा केली जाते.

Published By Shubh Prabhat
On

गुढी पाडव्याच्या निमित्त जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथे पारंपरिक यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून कुस्त्यांच्या भव्य दंगलीने वातावरण रंगले आहे.  तीन दिवस चालणार्‍या या यात्रेत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

पाडव्याच्या दिवशी रामेश्वर मंदिरात रेवड्यांची उधळण करून भाविक आपली श्रद्धा व्यक्त करतात. तसेच मंदिरात अंबील वाटप करण्यात येते आणि श्रद्धेने बसविलेल्या काठ्यांची पूजा केली जाते. या निमित्ताने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रेदरम्यान दोन गावांची पारंपरिक भेट घेण्यात येते, ज्यामध्ये विविध कलागुणांचे सादरीकरण केले जाते. लाठ्या-काठ्या खेळल्या जातात आणि वाजत गाजत मिरवणुका काढत भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

Indian_Fast

याचबरोबर मौजपुरी येथे कुस्त्यांची भव्य दंगलही आयोजित करण्यात आली असून विविध जिल्ह्यांमधून आलेले पैलवान आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत आहेत. या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती लाभत आहे.

या यात्रेसाठी सासरी गेलेल्या मुली, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मौजपुरी येथे एकत्र येत असून गावातील ही पारंपरिक यात्रा अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.

प्रतिनिधी

टॉप न्यूज