नंदापुरमध्ये भीषण आग; दोन भावंडांची आलिशान घरे जळून खाक!

५० ते ५५ क्विंटल कापूस, धान्य, सोने-दागिने आणि लाखोंची रोकड आगीत भस्मसात; अग्निशामक दलाच्या विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Published By Dainik Shubh Prabhat
On

नंदापूर, ता. जि. जालना : दिवाळीच्या सणाच्या आनंदावर नंदापूर गावात भीषण आगीच्या घटनेने विरजण पडले. गावातील प्रतिष्ठित उबाळे कुटुंबातील दोन भावंडांच्या घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत गणेश किसनराव उबाळे आणि विजय किसनराव उबाळे या दोघांची शेजारी असलेली जुनी माळवदाची व माडीची आलिशान घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, सुमारे ५० ते ५५ क्विंटल कापूस, धान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बुधवारी (ता. ४) दिवाळीच्या सणाच्या धामधुमीत ही घटना घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घरातील वृद्ध आजी-आजोबांना सर्वप्रथम सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, घर लाकडी माळवदाचे असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले.

अग्निशामक दलाच्या विलंबामुळे संताप; हलगर्जीपणाचा आरोप

Indian_Fast

आगीची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी जालना अग्निशामक दलाशी संपर्क साधला. मात्र, फोन केल्यानंतर जवळपास एक तासाने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गाडी येण्यास विलंब होत असल्याने गावातील काही नागरिक स्वतः चारचाकी वाहनाने जालना अग्निशामक दलाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी गाडी घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, नागरिक घटनास्थळी परतल्यानंतरही जवळपास अर्ध्या तासाने अग्निशामक दलाची गाडी पोहोचली.

दरम्यान, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहराबाहेरील घटना असल्याने अग्निशामक दलाकडून प्रत्येक गाडीसाठी चार ते पाच हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. पैसे देण्यास मान्यता दिल्यानंतर गाडी पाठविण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अग्निशामक दलाच्या कार्यपद्धतीवर तसेच ग्रामीण भागातील आपत्कालीन सेवांबाबतच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आगीने संपूर्ण घराला वेढा घातल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचल्याने तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. अखेर अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत दोन्ही घरांतील संपूर्ण साहित्य, कापूस, धान्य, दागिने, रोख रक्कम आणि संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनाने तत्परतेने मदत करणे अपेक्षित असताना अग्निशामक दलाच्या कथित विलंबामुळे शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. या घटनेने ग्रामीण भागातील अग्निशमन व्यवस्थेचा आणि आपत्कालीन प्रतिसादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासन व संबंधित प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सरपंच दत्तू (नंदापूर) म्हणाले : "आग लागल्यानंतर आम्ही गावकऱ्यांनी ती विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग खूप मोठी असल्याने अग्निशामक दलाशी संपर्क साधला. गाडी घटनास्थळी पोहोचण्यास खूप विलंब झाला. त्यामुळे शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन आणि प्रशासन गंभीर नसल्याचे या घटनेवरून वाटते."

अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर माधव पाणीपट्टे म्हणाले : "जालना शहरातही एका ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे आमचे पथक प्रथम त्या ठिकाणी गेले होते. यामुळे नंदापूरला पोहोचण्यास वेळ झाला. आमच्याकडे दुसरी गाडी उपलब्ध होती; मात्र मनुष्यबळ कमी असल्याने ती तातडीने बाहेर काढणे शक्य झाले नाही. तरीही आम्ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला."

प्रतिनिधी

संबंधित समाचार