वर्षाला तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून ५० जणांना १.३२ कोटींचा गंडा; मुख्य सूत्रधार मुंबईतून जेरबंद!
बाबा ट्रेडिंग आणि एफएमसीजी कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
जालना : गुंतवणुकीवर वर्षभरात तिप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून शिक्षकासह तब्बल ५० जणांची १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला जालना आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वांद्रे येथून अटक केली आहे. मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याला अटक करून जालन्यात आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील शेरसवार नगर येथील रहिवासी मोहम्मद फेरोज अब्दुल सत्तार हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांच्यासह त्यांचे भाऊ आणि जवळच्या परिचयातील सुमारे ५० गुंतवणूकदारांना आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढले. आरोपींनी मार्केटिंग क्षेत्रात 'बाबा ट्रेडिंग' या नावाने व्यवसाय सुरू केला होता. तसेच बाबा ट्रेडिंग आणि एफएमसीजी कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवलेल्या रकमेच्या वर्षभरात तिप्पट परतावा मिळेल, असे आकर्षक आमिष दाखवण्यात आले. मोठ्या आर्थिक परताव्याच्या आशेने अनेकांनी या कंपनीत पैसे गुंतवले. मात्र, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक जमा झाल्यानंतर आरोपींनी गुंतवणूकदारांना पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आणि पसार झाले.
https://twitter.com/SPrabhat72222/status/2117681625060524156?a=RchPpiZBVsNTrXVTYXM&s=20
या गुन्ह्यात आतापर्यंत वसीम अहमद अब्दुल गफार (वय ३७, रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) आणि मोहम्मद युनुस अहमद मोहम्मद सलीम (वय ३४, रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) या दोघांना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयीन आदेशानुसार हे दोन्ही आरोपी सध्या कारागृहात आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज सलाट हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
मोबाईल वापरत नसल्याने शोध घेण्यात अडचणी
मुख्य आरोपी एजाज सलाट हा मोबाईल फोनचा वापर करत नसल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने गोपनीय पद्धतीने तपास सुरू ठेवला होता. खबऱ्यामार्फत आरोपी मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईत रवाना झाले. तेथे निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेण्यात आला. निर्मल नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कदम, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे आणि त्यांच्या पथकाच्या सहकार्याने मुख्य आरोपी एजाज सलाट याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.
अटकेनंतर आरोपीला जालन्यात आणून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्याला जिल्हा व सत्र न्यायालयातील एमपीआयडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आर्थिक फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम, पैशांचा व्यवहार, इतर साथीदारांचा सहभाग आणि फसवणुकीच्या व्याप्तीचा तपास केला जाण्याची शक्यता आहे.
फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा
वर्षभरात गुंतवणुकीच्या रकमेच्या तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून हा गुन्हा करण्यात आल्याने या प्रकरणातील गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाबा ट्रेडिंग किंवा संबंधित एफएमसीजी कंपनीमध्ये आरोपींच्या आमिषाला बळी पडून ज्यांनी गुंतवणूक केली आहे आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे, अशा नागरिकांनी जालना आर्थिक गुन्हे शाखेकडे येऊन आपले तक्रार अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबिरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, गोविंद दराडे आणि महिला अंमलदार मंदा नाटकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Help

