‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या वर्षावास सांगता सोहळ्याचे आयोजन
मानेगाव (खा.) येथे 30 ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक व धम्मविषयक कार्यक्रम
जालना/प्रतिनिधी ः जालना तालुक्यातील मानेगाव (खा.) येथील आनंद बुद्ध विहाराच्या वतीने आषाढी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाच्या वर्षावास सांगता सोहळ्याचे आयोजन आज शुक्रवार, दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात धम्मप्रवचन, बुद्धपूजा, धम्मदेशना, भोजनदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या ग्रंथपठणाला वर्षावासाच्या काळात सातत्याने प्रतिसाद मिळाला. वर्षावासाच्या सांगता सोहळ्यानिमित्त परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त उपासक-उपासिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी खामगाव येथील पूज्य भंते पटिसेन तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील पूज्य भंते शासन मैत्रेय यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच ग्रंथवाचक म्हणून माजी सरपंच राजेंद्र भीमराव अचलखांब हे भूमिका बजावणार आहेत.
दिवसभर विविध कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता पंचशील धम्म ध्वजारोहणाने होणार आहे. सकाळी 10.30 ते 11 या वेळेत भिक्खू संघाचे उपोसत व्रतधारक उपस्थितीत उपासक-उपासिकांसाठी भोजनदान, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बौद्ध पूजा व धम्मदेशना तर दुपारी 4 ते 6 या वेळेत भोजनदानाचा कार्यक्रम होईल. रात्री 8 ते 11 या वेळेत कलापत शीर्षक ः डाकू अंगुलीमाल हाती घेऊन भाला शरण आला बुद्धास (सावंगी बर्डी) या कार्यक्रमातून धम्म विषयक संदेश दिला जाणार आहे.
भगवान बुद्धांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणा, समता आणि बंधुतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील विचारांचे वाचन व आचरण करण्याची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. वर्षावासाच्या माध्यमातून धम्मज्ञानाचा प्रसार आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन भीमराज युवा मित्र मंडळ व समस्त बौद्ध उपासक-उपासिका, मानेगाव (खा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहत धम्मलाभ घ्यावा, तसेच सर्व उपासक-उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Help
