दिवाळीत दोन कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी; नंदापुरात दोन घरे जळून खाक!

५५ क्विंटल कापूस, धान्य, सोने-चांदीचे दागिने आणि लाखोंची रोकड आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशामक दलाच्या विलंबावर ग्रामस्थांचा संताप

Published By Shubh Prabhat
On

नंदापूर, ता. जि. जालना : दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच नंदापूर गावात आगीच्या भीषण दुर्घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गणेश किसनराव उबाळे आणि विजय किसनराव उबाळे या दोन भावंडांची शेजारील घरे पूर्णपणे जळून खाक झाली.

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र सुमारे ५० ते ५५ क्विंटल कापूस, धान्य, सोने-चांदीचे दागिने, लाखोंची रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बुधवारी (ता. ४) दिवाळीच्या धामधुमीत ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील वृद्ध आजी-आजोबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, दोन्ही घरे जुनी माळवदाची व लाकडी बांधकामाची असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरांना वेढा घातल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले.

Indian_Fast

अग्निशामक दलाच्या विलंबाने नुकसान वाढल्याचा आरोप

आगीची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी जालना अग्निशामक दलाला संपर्क साधला. मात्र, अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास जवळपास एक तासाचा विलंब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाडी वेळेत येत नसल्याने काही नागरिक स्वतः चारचाकी वाहनाने जालना येथील अग्निशामक दलाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी अग्निशमन वाहन घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, नागरिक गावात परतल्यानंतरही गाडी पोहोचण्यास आणखी अर्धा तास लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याशिवाय, शहराबाहेरील भागात आग लागल्याने अग्निशामक दलाच्या प्रत्येक गाडीसाठी चार ते पाच हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. पैसे देण्याची तयारी दर्शविल्यानंतरच गाडी पाठविण्याची तयारी दाखविण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या आरोपांमुळे ग्रामीण भागातील आपत्कालीन सेवांची उपलब्धता आणि अग्निशमन यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने दोन्ही घरांना पूर्णपणे कवेत घेतले होते. त्यामुळे घरातील साहित्य वाचविण्याची संधीही मिळाली नाही. अखेर अग्निशामक दल आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोपर्यंत दोन्ही कुटुंबांच्या आयुष्यभराच्या कष्टाने उभा केलेला संसार आगीत भस्मसात झाला होता.

शेतमालासह मौल्यवान वस्तूंची राखरांगोळी

घरात साठवून ठेवलेला सुमारे ५० ते ५५ क्विंटल कापूस, धान्य, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कपडे, फर्निचर आणि इतर जीवनावश्यक वस्तू आगीत नष्ट झाल्या. दिवाळीच्या काळातच ही दुर्घटना घडल्याने उबाळे कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे. नुकसानीचा अधिकृत पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या घटनेने ग्रामीण भागातील अग्निशमन व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. गावागावांत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आग दुर्घटनांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना अग्निशामक दलाच्या कथित विलंबामुळे नुकसान वाढल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

  • आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी ती विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशामक दलाशी संपर्क साधण्यात आला. गाडी पोहोचण्यास बराच विलंब झाला. त्यामुळे दोन शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे संकट ओढवले असताना शासन आणि प्रशासनाने तत्परतेने मदत करणे अपेक्षित आहे.
  • जालना शहरातही अन्य एका ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे आमचे पथक प्रथम त्या ठिकाणी गेले होते. यामुळे नंदापूर येथे पोहोचण्यास वेळ लागला. आमच्याकडे दुसरी गाडी उपलब्ध होती; मात्र मनुष्यबळ कमी असल्याने ती तातडीने बाहेर काढणे शक्य झाले नाही. तरीही घटनास्थळी लवकर पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला.

प्रतिनिधी

संबंधित समाचार