आयआरसीटीसीच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे बौद्ध भाविक संतप्त; बोधगया ऐवजी इतर मंदिरांचे दर्शन घडवल्याचा आरोप

व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडत न्यायाची मागणी केली आहे.

Published By Shubh Prabhat
On

रेल्वेच्या पर्यटन विभागामार्फत आयोजित धम्म यात्रेदरम्यान बौद्ध भाविकांनी आयआरसीटीसी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नियोजित स्थळांऐवजी इतर मंदिरांमध्ये नेले जात असल्याचा आरोप यात्रेकरूंनी केला आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडत न्यायाची मागणी केली आहे.

भाविकांच्या म्हणण्यानुसार, ही यात्रा विशेषतः बोधगया, राजगीर, वेणूवन यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक बौद्ध स्थळांच्या दर्शनासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून त्यांना विष्णू मंदिर, शंकर मंदिर यांसारख्या इतर धार्मिक स्थळांकडे नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही बौद्ध धम्म स्वीकारला असून आम्हाला केवळ बौद्ध स्थळांचेच दर्शन हवे आहे, अशी स्पष्ट भूमिका भाविकांनी मांडली आहे.

https://www.instagram.com/reel/DYhx4gGT-4A/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Indian_Fast

यात्रेदरम्यान प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचाही सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. बिहारमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. अनेक महिला भाविकांनी उन्हात केवळ गरम पाणी उपलब्ध होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. वृद्ध प्रवासी आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचेही भाविकांनी म्हटले आहे.

काही भाविकांनी आरोप केला की, तुम्हाला जायचे नसेल तर बसमध्ये बसून राहा, अशा भाषेत आयआरसीटीसीचे कर्मचारी बोलत आहेत. यामुळे यात्रेकरूंमध्ये संताप अधिक वाढला आहे. उन्हात तासन्तास थांबवून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

भाविकांनी प्रशासनाकडे तातडीने योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे. आम्हाला इतरत्र फिरवू नये, थेट राजगीर किंवा पुन्हा बोधगया येथे नेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर दर्शनाची व्यवस्था शक्य नसेल, तर किमान योग्य निवास आणि रात्री वेळेवर रेल्वे स्थानकावर पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे आयआरसीटीसीच्या पर्यटन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून धार्मिक पर्यटनासाठी येणार्‍या प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत प्रशासन किती गंभीर आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिनिधी