पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
मतमोजणी प्रक्रियेत अचूकता आणि नियमपालनाला प्राधान्य देण्याच्या सूचना
फलटण प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील बॅडमिंटन सभागृहात आयोजित करण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि निर्धारित नियमांनुसार पार पाडण्यासाठी या प्रशिक्षणात विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी श्रीमती तेली-उगले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीदरम्यान कोणतेही दडपण न घेता काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक टप्प्यावर अचूकता राखावी, आवश्यक नमुने व्यवस्थित भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत आणि मतपत्रिकांच्या वैध-अवैधतेबाबतचे आक्षेप नियमानुसार निकाली काढावेत, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणात मतपेट्या उघडण्याची पद्धत, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, विविध नमुने भरणे, मतपत्रिकांचे वैध व अवैध असे वर्गीकरण करणे आणि प्रत्येक फेरीनंतर निकालाचा नमुना संबंधित पथकाकडे जमा करणे याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन व सुविधांची माहितीही देण्यात आली.
या प्रशिक्षणास पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, अचूक आणि नियमानुसार पार पाडण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.

Help

