जालन्यात अल्पवयीन मुलांच्या हातात तलवारी! दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून चार धारदार शस्त्रे जप्त

चंदनझिरा पोलिसांची महात्मा फुले चौकात कारवाई; दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल, यापूर्वी खुनाच्या गुन्ह्याचीही नोंद

Published By Shubh Prabhat
On

जालना : शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू असतानाच चंदनझिरा पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून चार धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) सायंकाळी महात्मा फुले चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या तलवारींची अंदाजे किंमत दहा हजार रुपये असून, याप्रकरणी दोन्ही बालकांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यातील कर्मचारी दैनंदिन कामकाज करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत दोन जण पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये धारदार तलवारी घेऊन इंद्रायणी चौक येथून महात्मा फुले चौकाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने दोन पंचांसह महात्मा फुले चौक परिसरात सापळा रचला.

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हातात पांढऱ्या रंगाची गोणी घेऊन दोन जण येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही गोणीसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघेही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पंचांसमक्ष गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये तीन लोखंडी आणि एक स्टीलची अशा एकूण चार धारदार तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या आहेत.

Indian_Fast

विशेष म्हणजे, या कारवाईतील दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध यापूर्वीही चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून धारदार शस्त्रे बाळगण्याचे प्रकार समोर येत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकांनी मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे

अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये, यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनावर, मित्रपरिवारावर आणि दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी केले आहे. मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीचा तसेच चित्रपट, वेब मालिका आणि चुकीच्या संगतीचा काही मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यातून धारदार शस्त्रे बाळगणे किंवा त्यांचे प्रदर्शन करण्यासारख्या बेकायदेशीर कृत्यांकडे मुले आकर्षित होण्याची शक्यता असते.

पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर, मित्रपरिवारावर आणि वर्तनातील बदलांवर विशेष लक्ष द्यावे. पाल्यांकडे धारदार शस्त्रे किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाची आहे. मुलांना योग्य संस्कार, मार्गदर्शन आणि कायद्याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणारे, त्यांची विक्री करणारे तसेच अशा गैरकृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही चंदनझिरा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहाय्यक फौजदार मनसुब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अभिजीत वायकोस आणि शिवाजी जमधडे यांच्या पथकाने केली.

प्रतिनिधी

संबंधित समाचार