प्रेमाच्या वाटेवर जातांना...
आपला एक निर्णय आयुष्य बदलू शकतो तर तोच निर्णय चुकला तर आयुष्य उध्वस्त देखील होऊ शकते...
आजच्या बदलत्या काळात स्वातंत्र्य, प्रेम आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार याबद्दल खूप चर्चा होते. पण काही निर्णय असे असतात, ज्यांचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. घरच्यांना न सांगता, त्यांच्या भावना दुखावून पळून जाण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक आहे.
पळून जाणार्या मुलीला त्या क्षणी प्रेम, स्वप्नं आणि नवीन आयुष्य याचंच आकर्षण दिसतं. तिला वाटतं की ती योग्य निर्णय घेत आहे. पण वास्तव अनेकदा खूप वेगळं असतं. आई-वडिलांनी जपलेली प्रतिष्ठा, त्यांचा विश्वास आणि आयुष्यभर दिलेला आधार एका क्षणात तुटतो. त्या मुलीच्या पाठीशी उभं राहणारं कुटुंबच दूर जातं.
सुरुवातीला सगळं ठीक वाटतं. पण कालांतराने जेव्हा वास्तव समोर येतं, तेव्हा परिस्थिती बदलायला लागते. आर्थिक अडचणी, जबाबदार्या, आणि एकमेकांमधील मतभेद हळूहळू वाढू लागतात. काही वेळा नवरा चुकीच्या सवयींकडे वळतो, रागात मारहाण करतो, किंवा पत्नीच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. अशा वेळी त्या मुलीला समजावणारे, तिच्यासाठी उभे राहणारे कोणीही नसते.
अशा वेळी तिच्यावर संसाराची, मुलांची जबाबदारी येते. एकटीने हे सगळं सांभाळणं खूप कठीण होतं. निराशा, भीती आणि असुरक्षितता यामुळे काही मुली चुकीच्या मार्गाकडे वळतात आणि त्यांचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होतं.
हा विषय केवळ एका मुलीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आहे. निर्णय घेताना फक्त त्या क्षणाचा विचार न करता, पुढील आयुष्याचा विचार करणे खूप आवश्यक आहे. प्रेम महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर सुरक्षितता, स्थैर्य आणि कुटुंबाचा आधारही तितकाच महत्वाचा आहे.
मुलींनो, आयुष्यात मोठे निर्णय घेताना भावना आणि वास्तव यांचा समतोल साधा. आई-वडिलांचा अनुभव, त्यांची काळजी आणि त्यांचं प्रेम हे तुमच्यासाठी ढाल आहे. त्या ढालीला दूर करून पुढे जाण्याआधी एकदा थांबा, विचार करा.
क्षणिक निर्णय आयुष्यभराची शिक्षा बनू शकतो. म्हणूनच पायापाशी पाहू नका, दूरवरचा विचार करा. तुमचं आयुष्य अनमोल आहे, त्याचा निर्णय घेताना सावध रहा. कारण प्रेमाच्या वाटेवर जातांना आपला एक निर्णय आयुष्य बदलू शकतो तर तोच निर्णय चुकला तर आयुष्य उध्वस्त देखील होऊ शकते... म्हणून निर्णय तुमचाच आहे. योग्य निर्णय घ्या हीच अपेक्षा...!
अच्युत मोरे...
संपादक, दैनिक शुभ प्रभात


