नंदापूरच्या रमाई नगर दलित शेतवस्तीकडे जाणारा रस्ता चिखलमय; वर्षानुवर्षे नागरिकांची फरफट
तातडीने रस्ता करण्याची मागणी
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना, प्रतिनिधी : जालना तालुक्यातील नंदापूर येथील रमाई नगर दलित शेतवस्तीकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, थोडासा जरी पाऊस पडला तरी संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्याने येथील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अंदाजे ५० घरांची रमाई नगर वस्ती या रस्त्यावर अवलंबून असून, वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. त्यामुळे पायी चालणेही कठीण बनते. शेतकरी शेतात जाण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र चिखलामुळे दुचाकी वाहने घसरतात, बैलगाड्या व इतर वाहने अडकतात आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या वस्तीत राहणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांनाही दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. एखादा रुग्ण अचानक आजारी पडल्यास रुग्णवाहिकेलाही वस्तीपर्यंत पोहोचणे अवघड होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकरी आणि नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
रमाई नगर दलित शेतवस्तीला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या रस्त्याचे तातडीने खडीकरण किंवा काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी रस्ता तयार करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला गेला नाही तर जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन रमाई नगर शेतवस्तीतील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


