अंबड रोडवर भटक्या कुत्र्यांचा हैदोस; हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती; 

महापालिकेच्या निष्क्रियतेवर संताप

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना शहरातील अंबड रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी जालना महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी अंबड रोड परिसरात एका चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते नरेश अवघड यांनी उपस्थित केला आहे.

अंबड रोडवरील नरेश कॉम्प्लेक्स परिसरात नुकतीच आणखी एक घटना घडली. स्कूटरवरून जात असलेल्या एका तरुणावर अचानक भटक्या कुत्र्याने हल्ला चढविला. तरुणाने स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्रा त्याला सोडण्यास तयार नव्हता. अखेर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत तरुणाची सुटका केली.
या भागात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात जखमी तसेच रेबीजची लक्षणे असलेल्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने कुत्र्यांचे पकड मोहीम राबवून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास संबंधित विभागप्रमुख आणि कुत्र्यांचे पकड व पुनर्वसन करणार्‍या संस्थेला जबाबदार धरून संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी