जालना पोलिसांचा वाळूमाफियांना दणका; ७१ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोदावरी नदीपात्रातून सुरू होता अवैध वाळू उपसा; मध्यरात्री गुंज येथे पोलिसांचा छापा, वाहनचालक अंधाराचा फायदा घेत पसार

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना | प्रतिनिधी : गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा करून तिची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंज गावाच्या शिवारात मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी तब्बल ७१ लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालक वाहने जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. गुंज गावाच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन केले जात असून, वाहनांमध्ये वाळू भरून तिची चोरटी वाहतूक आणि विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची खातरजमा केल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाईची आखणी केली. पोलिसांनी गुंज बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयित वाहनांवर नजर ठेवली.

Indian_Fast

काही वेळात वाळूची अवैध वाहतूक करणारी वाहने पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांचे पथक कारवाईसाठी पुढे सरकत असल्याचे लक्षात येताच संबंधित वाहनचालकांनी वाहने रस्त्यावरच सोडली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

पोलिसांनी तत्काळ सर्व वाहने ताब्यात घेत त्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उपसा केलेली वाळू आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष वाळू आणि वाहने ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली.

या कारवाईत साडेसात ब्रास वाळूसह वाहने, यंत्रसामग्री आणि दोन भ्रमणध्वनी संच असा एकूण ७१ लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोदावरी नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात वाळूचा बेकायदेशीर उपसा करून तिची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा आणि यंत्रसामग्रीचा मालक कोण आहे, वाळू उत्खननाच्या या प्रकारामागे नेमके कोणाचे जाळे कार्यरत आहे, तसेच या अवैध वाळू वाहतुकीचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह गौण खनिज कायद्यान्वये घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा हा अनेक दिवसांपासून गंभीर प्रश्न बनला आहे. रात्रीच्या वेळी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा करून तिची मोठ्या वाहनांतून चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, पोलीस अंमलदार निखिल गायकवाड, प्रताप सुंदर्डे, गोल्डे आणि पोटे यांच्या पथकाने केली.

प्रतिनिधी