परभणीतील तिघांनी जालन्यातून डुकरांची चोरी केल्याचा आरोप
दोन डुकरांसह एक जेरबंद; मौजपुरी पोलीसात गुन्हा दखल
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरातून डुकरांची चोरी केल्याप्रकरणी परभणी येथील तिघांविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले असून त्याच्याकडून चोरीची दोन डुकरे, एक बकरी, दोन बकरीची पिल्ले तसेच कार जप्त करण्यात आली आहे. उर्वरित दोघेजण घटनास्थळावरून पसार झाले.
शनिवार दि. 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी लहु गुणाजी पवार रा. रामनगर, साखर कारखाना, जालना यांनी फिर्याद दिली आहे. ते शेती व डुकरपालन व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीची सुमारे 90 डुकरे रामनगर येथील बाजारपट्टी परिसरात चरतात. मागील महिनाभरात परिसरातून डुकरे चोरीस जात असल्याने त्यांनी नातेवाईक व मित्रांना लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादींच्या पुतण्याला सदर कार विरेगावहून जालन्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फिर्यादी, त्यांचा पुतण्या सचिन अंकुश पवार आणि इतर नातेवाईकांनी कारचा पाठलाग करून रात्री अकराच्या सुमारास जालना शहरातील डी-मार्टजवळ कार अडवली.
कारची तपासणी केली असता त्यामध्ये दोन डुकरे, एक बकरी आणि दोन बकरीची पिल्ले आढळून आली. यावेळी कारमधील व्यक्तींना डुकरांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत हुज्जत घातली. दरम्यान, दोन संशयित तेथून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधील एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपले नाव पवन राजू मुळे (वय 34, रा. वर्मानगर, परभणी) असे सांगितले. तसेच त्याच्या साथीदारांची नावे सोनुसिंग पुनमसिंग टाक (रा. नवा मोढा, परभणी) आणि अजितसिंग बावरी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) अशी असल्याचे सांगितले.
कारमध्ये आढळून आलेली दोन डुकरे ही फिर्यादी लहु पवार यांचीच असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या दोन पांढर्या रंगाच्या डुकरांची किंमत सुमारे 8 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात पवन राजू मुळे, सोनुसिंग पुनमसिंग टाक आणि अजितसिंग बावरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या दोन्ही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.


