बेपत्ता तरुणाच्या हत्येचा वर्षभरानंतर उलगडा; आर्थिक व्यवहारातून मित्रानेच केला खून; डीएनए अहवालाने मृतदेहाची ओळख पटली
मृतदेह दुधना नदीत फेकल्याची कबुली, आरोपीवर खुनाचा गुन्हा
जालना : तालुका पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२५ मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तब्बल वर्षभरानंतर उलगडा झाला असून, आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून त्याच्या मित्रानेच गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुधना नदीत फेकल्याचेही समोर आले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशनगर (जालना) येथील हृषीकेश प्रकाश पवार (वय २०) हा २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी घरातून बाजारात जात असल्याचे सांगून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने त्याची आई ज्योती प्रकाश पवार यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मिसिंग क्रमांक ६९/२०२५ नोंदवून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मोबाईलच्या कॉल डिटेल्सची तपासणी, मित्रांचे जबाब, तसेच शोधपत्रिका प्रसिद्ध करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
तपासात आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्कॉर्पिओ वाहनातून गोलापांगरी येथील पुलावर नेऊन दुधना नदीच्या प्रवाहात फेकल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अविनाश अंकुश वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) (खून) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.


