दुबईत हजारो भारतीय अडचणीत, केंद्र सरकार शांत; खासदार डॉ. कल्याण काळेंचा हल्लाबोल
त्या काळात इराणसंबंधित तणावामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.
जालना : दुबईमध्ये अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडल्याचा धक्कादायक अनुभव जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केला असून या प्रकरणात केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर एका खासदारालाच प्रतिसाद मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचा विचार करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले की, ते 27 फेब्रुवारी रोजी मुंबईमार्गे दुबईला गेले होते. 28 फेब्रुवारी रोजी दुबई येथे पोहोचल्यानंतर ते आपल्या परिवारासह तसेच आणखी दोन परिवारांसोबत हॉटेलकडे जात असताना अचानक परिसरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि परतीचा प्रवास होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली.
त्या काळात इराणसंबंधित तणावामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. हजारो भारतीय नागरिक दुबईत अडकले होते. विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण आपल्या घरी सुरक्षित परत जाऊ शकू की नाही, अशी भीती अनेकांच्या मनात होती, असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात आपण तात्काळ केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला ई-मेल व पत्राद्वारे माहिती दिली होती, मात्र त्यावर साधा प्रतिसादही मिळाला नाही, अशी खंत डॉ. काळे यांनी व्यक्त केली. माझी अपेक्षा होती की केंद्रातील उड्डाणमंत्री किंवा संबंधित मंत्री पत्रकार परिषद घेऊन परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना धीर देतील. किती लोक अडकले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी विमानांची व्यवस्था कशी केली जाणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक होते. परंतु तसे काही झाले नाही, असे ते म्हणाले.
दुबईतील काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल बुकिंगची मुदत संपलेल्या नागरिकांच्या निवासाची व्यवस्था तेथील प्रशासनाने केली होती. ज्यांची हॉटेलची तारीख संपली होती त्यांचा पुढील खर्च तेथील प्रशासनाने उचलण्याची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ. काळे म्हणाले की, आपण राजकीय टीका करण्यासाठी हे बोलत नाही, परंतु परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी सरकारने सातत्याने संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून स्पष्ट माहिती आणि मार्गदर्शन मिळाले असते तर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता.
काही ओळखीच्या व्यक्तींनी स्थानिक पातळीवर मदतीसाठी प्रयत्न केले, मात्र विमानतळ बंद असल्यामुळे परिस्थिती अधिकच कठीण झाली होती. साधारण तीन ते चार दिवसांनंतर हळूहळू विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही भारतीय नागरिकांना परत येणे शक्य झाले.
दरम्यान, आपल्या सुखरूप परतीसाठी मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या प्रार्थना आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल डॉ. कल्याण काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मातृभूमीत परत आल्यानंतर मला जसा एखाद्या लेकराला आईच्या कुशीत परत आल्यानंतर आनंद होतो तसा आनंद झाला. नागरिकांनी दिलेल्या प्रेमामुळेच या कठीण परिस्थितीत धैर्य मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण घटनेमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अधिक प्रभावी आणि तत्पर यंत्रणा उभारण्याची गरज असल्याची चर्चा पुन्हा एकदा पुढे आली आहे. तसेच संकटाच्या काळात भारतीय नागरिकांशी थेट संवाद साधण्याची व्यवस्था मजबूत करण्याची मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.


