जालन्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; ३ सप्टेंबरला ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’

समिटमध्ये जालना आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकास, नवीन गुंतवणूक, निर्यात-आयात, लॉजिस्टिक्स आणि रोजगारनिर्मितीवर सविस्तर चर्चा होणार

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना : जालना जिल्ह्याच्या औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षमतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासन, जालना यांच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल समिट २०२६’चे आयोजन ३ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल सिद्धार्थ द फर्न, जालना येथे करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या समिटमध्ये जालना आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकास, नवीन गुंतवणूक, निर्यात-आयात, लॉजिस्टिक्स आणि रोजगारनिर्मितीवर सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती जालना फस्ट च्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी जालना फस्ट चे अध्यक्ष गोविंद गोयल, उपाध्यक्ष शुभम सोनी, सह सचिव आयुष बंसल, पीआरओ राहुल अग्रवाल यांची उपस्थिती होती.

जालन्यात नव्याने कार्यान्वित झालेल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क (MMLP/ड्राय पोर्ट)चा स्थानिक उद्योगांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा या समिटचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. जालन्यातून निर्यात-आयात वाढविणे, लॉजिस्टिक्सचा खर्च व वेळ कमी करणे, नवीन उद्योगांना आकर्षित करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, या उद्देशाने समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

Indian_Fast

या समिटसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे (JNPA) अध्यक्ष गौरव दयाल (IAS) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह (IAS) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (IAS), दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध नामांकित औद्योगिक समूहांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

समिटमध्ये जालना MMLP/ड्राय पोर्टवर स्वतंत्र की-नोट सत्र आणि पॅनेल चर्चा होणार आहे. यामध्ये जालन्यातून थेट निर्यात-आयात वाढविण्याच्या संधी, कंटेनर व मल्टी-मोडल कार्गो वाहतूक, JNPA आणि देश-विदेशातील बाजारपेठांशी कनेक्टिव्हिटी, रेल्वे मालवाहतूक, वेअरहाउसिंग, फ्रेट, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील नव्या व्यवसायाच्या संधी यावर विचारमंथन होणार आहे.

नवीन औद्योगिक गुंतवणुकीवरही समिटमध्ये विशेष भर दिला जाणार आहे. स्टील व स्टील अॅन्सिलरीज, ऑटोमोबाईल व ऑटो अॅन्सिलरीज, अभियांत्रिकी, कृषी प्रक्रिया, बियाणे, सिल्क, ऊर्जा, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग आणि उत्पादन क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदारांना जालन्यातील उपलब्ध संधींची माहिती देण्यात येणार आहे.

उद्योग आणि शासन यांच्यात थेट संवाद घडवून आणणे, हा देखील समिटचा महत्त्वाचा उद्देश आहे. जमीन, MIDC पायाभूत सुविधा, वीज, पाणी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स, निर्यात सुविधा आणि उद्योग सुलभीकरणाशी संबंधित प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची संधी उद्योग प्रतिनिधींना मिळणार आहे.

समिटमध्ये MMLPवरील की-नोट व पॅनेल चर्चा, JNPAचे विशेष संबोधन, MIDC CEO यांचे संबोधन, नवीन औद्योगिक गुंतवणुकीवरील सत्र, रेल्वे कनेक्टिव्हिटीवरील मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तर सत्रांचा समावेश आहे. कार्यक्रमानंतर सहभागी प्रतिनिधींसाठी जालना MMLP/ड्राय पोर्टची विशेष भेटही आयोजित करण्यात आली आहे.

या समिटला Vikas Group of Companies यांचे Lead Sponsor म्हणून सहकार्य लाभले आहे. जालन्याची पारंपरिक स्टील, बियाणे, कृषी प्रक्रिया, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील औद्योगिक ताकद, समृद्धी महामार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि MMLP या सुविधांचा एकत्रित उपयोग करून जालना भविष्यात महाराष्ट्रातील महत्त्वाचे मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

जालना व मराठवाड्यातील उद्योगपती, निर्यातदार, आयातदार, उद्योजक, MSMEs, स्टार्टअप्स, लॉजिस्टिक्स सेवा प्रदाते, ट्रान्सपोर्टर्स, वेअरहाउसिंग कंपन्या आणि संभाव्य गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार