दिवाळीपूर्वी जालन्यात अन्न व औषध प्रशासनाचा दणका; ६ लाख ६० हजारांचा साठा जप्त

तीन मसाले व फरसाण उत्पादकांवर कारवाई; अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि कमी दर्जाचा असल्याचा संशय

Published By Shubh Prabhat
On

जालना : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जालना जिल्ह्यातील मसाले आणि नमकीन उत्पादकांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. या मोहिमेंतर्गत तीन ठिकाणी तपासणी करून हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर, शेव, लसूण चिवडा, मिश्र फरसाण आणि नमकीन असा एकूण ६ लाख ६० हजार ६०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

संबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन अस्वच्छ वातावरणात होत असल्याचा आणि ते कमी दर्जाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या काळात मिठाई, मसाले, फराळाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यांची खात्री करण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे.

सावरगाव हडप येथे मिरची व धने पावडर जप्त

२४ ऑक्टोबर रोजी सावरगाव हडप, ता. जालना येथील मे. अधिराज स्पाईसेस फुड्स या मसाला उत्पादकाच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. या वेळी मिरची पावडरचा ३६० किलो साठा आढळून आला. त्याची किंमत २ लाख २३ हजार २०० रुपये आहे. तसेच धने पावडरचा १०० किलो साठा, ज्याची किंमत ३९ हजार रुपये आहे, तोही जप्त करण्यात आला.

Indian_Fast

अशा प्रकारे या कारवाईत एकूण ४६० किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत २ लाख ६२ हजार २०० रुपये आहे. अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याचा आणि अन्नपदार्थ कमी दर्जाचे असल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली.

एमआयडीसीतील मसाला उत्पादकाकडून हळद व धने पावडर जप्त

२६ ऑक्टोबर रोजी जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील मे. के. एम. के. मसाले या उत्पादकाच्या ठिकाणी प्रशासनाने तपासणी केली. यावेळी हळद पावडरचा २९८ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत १ लाख १९ हजार २०० रुपये आहे. तसेच धने पावडरचा ५८ किलो साठा, ज्याची किंमत १४ हजार ५०० रुपये आहे, तोही जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण ३५६ किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत १ लाख ३३ हजार ७०० रुपये आहे. उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत आणि अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने हा साठा ताब्यात घेतला.

अंबडमध्ये शेव, लसूण चिवडा आणि फरसाणवर कारवाई

२६ ऑक्टोबर रोजी अंबड येथील मे. सह्याद्री फूड्स या फरसाण उत्पादकाच्या ठिकाणीही तपासणी करण्यात आली. या वेळी शेवचा ३२८ किलो साठा, किंमत ५२ हजार ४८० रुपये, लसूण चिवड्याचा २७८ किलो साठा, किंमत ४४ हजार ४८० रुपये, तसेच मिश्र फरसाणचा ४६३ किलो साठा, किंमत १ लाख ३८ हजार ९०० रुपये, जप्त करण्यात आला.

याशिवाय नमकीनची २०६ पाकिटे, एकूण १०३ किलो वजनाची आणि २८ हजार ८४० रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १ हजार १७२ किलो खाद्यपदार्थ आणि २०६ पाकिटांमधील नमकीनचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकूण किंमत २ लाख ६४ हजार ७०० रुपये आहे.

तीन कारवायांत ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १ हजार ९८८ किलो मसाले व फरसाण आणि नमकीनची २०६ पाकिटे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या संपूर्ण साठ्याची किंमत ६ लाख ६० हजार ६०० रुपये आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अ. ए. तांबे, अनुजा नगरारे आणि विनोद ओसावार यांनी केली. सह आयुक्त एस. आर. करकाळे आणि सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करताना स्वच्छता राखणे तसेच अन्नसुरक्षेशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता राखावी आणि निर्धारित गुणवत्ता निकषांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार