जैवविविधतेत पक्षी-प्राणी यांचे महत्त्व मोलाचे असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत  - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

वन प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय संकुलात प्रथमच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते.

Published By Shubh Prabhat
On

जालना :- जैवविविधतेचे संतुलन राखण्यात पक्षी व वन्यप्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पक्ष्यांचे अधिवास जपणे, झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

             महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, वन प्रशिक्षण संस्था जालना तसेच महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील वन प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय संकुलात प्रथमच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, विभागीय वन अधिकारी सुरेश वडदे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित पुकळे, वन प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक अजय जाधव, महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अमोल सावंत, पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम, मयूर साबळे आणि सुभाष पारे यांची उपस्थिती होती.

WhatsApp Image 2026-03-11 at 12.22.31

Indian_Fast

                कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली व स्व.श्री मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी व्हिडिओ संदेशद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छापर संदेश देऊन पर्यावरण संरक्षण हे आपले संविधानिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

              जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी पक्षी व प्राणी अत्यंत आवश्यक घटक आहेत. अनेक पक्षी कीड नियंत्रण, परागीभवन तसेच बियांचे प्रसारण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे शेती, जंगल आणि पर्यावरण या तिन्ही घटकांसाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास कमी होत असून त्यांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशील होण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांनी पक्षीनिरीक्षणाची आवड जोपासून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचवावा. पक्ष्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची संमेलने महत्त्वाची ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढविण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

              या पक्षीमित्र संमेलनाचे प्रस्ताविक विभागीय वन अधिकारी सुरेश वडोदे यांनी करून विद्यार्थी पक्षी मित्र संमेलनाचा उद्देश सांगितला व सामाजिक वनीकरण विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाभरात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमा बाबत माहिती दिली. तर महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सावंत यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याबाबत सांगून माझे पक्षी अभयारण्य या विषयावर स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले. महाराष्ट्रात शालेय पक्षी मित्र संमेलन हा उपक्रम अमोल सावंत यांच्या संकल्पनेत सुरू करण्यात आला आहे . जालना येथील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक तथा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम यांच्या जालना जिल्ह्यातील पक्षी वैभव या विषयावर आधारित छायाचित्राचे प्रदर्शन दाखवून जालना जिल्ह्याचे पक्षी वैभव यावर स्लाईड शो सादर केला. सर्व विद्यार्थ्यांसाठी पक्षी चित्रकला स्पर्धा घेऊन , पक्षासाठी कृत्रिम घरटे निर्मिती कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, व्याख्याने इ.उपक्रम घेण्यात आले आहे. या विद्यार्थी पक्षी संमेलनाचा उद्देश असा आहे की जालना जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक यांना पक्षी निरिक्षण आणि पक्षाबाबतीत जास्तीत जास्त माहिती होणे आणि त्या बाबतीत जनजागृती करणे हा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा व इतर स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त व सहभागी झालेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

              चित्रकला स्पर्धेचे मूल्यांकन कलाशिक्षक परिमल पेडगावकर व अमोल मोरे यांनी केले. पक्षी संमेलनात सहभाग नोंदवलेल्या सर्व शाळांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक मनिषा पाटील यांनी केले.यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इको क्लबच्या निवडक दोन शाळांचे प्रत्येकी 15 ते 20 विद्यार्थी व प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा मास्टर ट्रेनर मधुकर गायकवाड, जालना राष्ट्रीय हरीत सेना तथा महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे मयूर साबळे , जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र पक्षी मित्र आजीवन सभासद सुभाष पारे तसेच समस्त विभागातील वनअधिकारी, वनपाल, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी

संबंधित समाचार

टॉप न्यूज