समृद्धी महामार्ग प्रकरणाला मोठे वळण; ‘ॲपको’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
आ. बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्याला यश; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात होणार उच्चस्तरीय बैठक
जालना, प्रतिनिधी : जालना–नांदेड समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कथित अवैध मुरूम उत्खनन, शासनाच्या महसुलाचे नुकसान आणि कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून कंत्राटदार ॲपको इन्फ्राटेक कंपनी व संबंधितांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लघु पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक योगेश राजू वैद्य यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ०३२४/२०२६ नोंद करण्यात आला असून, पुढील तपास परतूर पोलीस करीत आहेत.
मंठा तालुक्यात ८२ हजार ५८९ ब्रास, तर परतूर तालुक्यात २ लाख ६ हजार ८३२ ब्रास अतिरिक्त मुरूम उत्खनन झाल्याचा दावा उपलब्ध मोजणीच्या आधारे करण्यात आला आहे.
आमदार लोणीकर यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंजूर भराव साहित्याऐवजी काही ठिकाणी काळ्या मातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली असती तर कथित अवैध उत्खनन रोखता आले असते, असे नमूद करत जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस जालना जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाचे झालेले नुकसान वसूल करावे, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.


