हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेची रेल्वेकडून दखल
स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत स्वच्छता मोहिमेवर भर
Published By Shubh Prabhat
On
नांदेड : हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंवरील प्रवेश व निर्गमन मार्गांजवळ साचलेला कचरा आणि अस्वच्छतेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. स्थानक परिसरातील अस्वच्छतेमुळे प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे.
हुजूर साहिब नांदेड हे शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार तसेच प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने स्थानक परिसराची स्वच्छता आणि चांगली प्रतिमा राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर प्रभावित भाग रेल्वे हद्दीबाहेर असल्याने कचरा टाकणार्या व्यक्तींवर रेल्वेकडून थेट दंडात्मक कारवाई करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र परिस्थितीत तातडीने सुधारणा व्हावी यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


