फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य कौतुकास्पद : रणजितसिंह नाईक निंबाळकर
दहा वर्षांची परंपरा; २ हजार स्पर्धकांचा सहभाग, अवयवदानाचा संदेश देत माजी खासदारांनी भरला संकल्प अर्ज
फलटण प्रतिनिधी : जोशी हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या वतीने सलग दहा वर्षे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’च्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी आणि डॉ. प्राची जोशी यांनी व्यायामाचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमातून निसर्गसंवर्धन आणि अवयवदानाचा संदेशही दिला जात असून, त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’च्या पारितोषिक वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अभिनेते समीर धर्माधिकारी, अपर्णा धर्माधिकारी, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्राची जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी आयोजकांचे आभार मानले. नियमित व्यायामाचे महत्त्व या उपक्रमामुळे अधिक स्पष्ट झाल्याचे सांगत त्यांनी आगामी काळातही मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. फलटणमधील क्रीडा संस्कृती आणि व्यायामाची परंपरा पुढे नेण्याचे काम डॉ. प्रसाद जोशी करत असल्याचे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी नमूद केले.
डॉ. प्रसाद जोशी यांनी प्रास्ताविकात मॅरेथॉनच्या प्रवासाची माहिती दिली. पहिल्या वर्षी २०० ते २५० स्पर्धकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात यंदा सुमारे २ हजार स्पर्धक सहभागी झाले. ३, ५, १० आणि २१ किलोमीटर अशा विविध गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रत्येकी १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. विविध गटांतील विजेत्यांना एकूण ७२ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे रोबोट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या ७५० रुग्णांनी तीन किलोमीटर चालण्याची स्पर्धा पूर्ण केली. वयाच्या ७३व्या वर्षी सुरेश चिंचकर आणि ८४व्या वर्षी गणपतराव मोहिते यांनीही सलग पाचव्या वर्षी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन ह.भ.प. नवनाथ कोलवडकर आणि अमृता पंडित यांनी केले, तर आभार डॉ. प्राची जोशी यांनी मानले.

Help

