तायक्वांदोने जिल्ह्याच्या खेळ संस्कृतीला नवी दिशा दिली-विष्णू पाचफुले यांचे प्रतिपादन
जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेचा समारोप
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व तायक्वांदो असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील 65 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत दमदार सहभाग नोंदविला.
प्रास्ताविकपर भाषणात अरविंद देशमुख म्हणाले की, तायक्वांदो हा फक्त क्रीडा प्रकार नसून शिस्त, आत्मविश्वास व शारीरिक तंदुरुस्ती घडविण्याचा उत्तम मार्ग आहे. जालन्यातील तरुणांनी या खेळातून घडविलेली कामगिरी प्रेरणादायी आहे. पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जालन्यातील खेळाडू आपला ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सय्यद निसार, राहुल ढाकणे, राहुल गायके, स्पर्धेचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडणारे मयूर पिवळ, सचिन गादेवाड, ज्ञानेश्वर मोरे, भागवत गोरे, आदित्य चव्हाण, हरीश खराबे यांनी विशेष परिश्रम घेतले.


