जलसंधारणाच्या कार्याची दखल; भाऊसाहेब घुगे यांना ‘जलक्रांती योद्धा’ पुरस्कार

नदी-नाला पुनर्जीवन, जलसाठा निर्मिती आणि वृक्षलागवडीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव

Published By Dainik Shubh Prabhat
On

छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यात जलसंधारण, नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण, जलसाठा निर्मिती तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आणि नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांना ‘जलक्रांती योद्धा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकशाही मराठी न्यूज चॅनलच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील मंगलम रिसॉर्ट, गंगापूर रोड येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते भाऊसाहेब घुगे यांना ‘जलक्रांती योद्धा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड, आमदार बबनराव लोणीकर, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रकाश सोळंके, लोकशाही मराठीचे संपादक विशाल पाटील, अँकर करण सिंह पवार, अँकर लागवी ओम सावंत, लोकशाही मराठीचे रिपोर्टर सुधाकर जाधव यांच्यासह भाऊसाहेब घुगे यांचे सहकारी प्रवीण फुके पाटील, राजीव पाटील, वायाळ, रामेश्वर दराडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जलसंधारणाच्या कामातून गावागावांत सकारात्मक बदल
भाऊसाहेब घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाउंडेशन आणि नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नदी-नाले खोलीकरण व रुंदीकरणाची कामे करण्यात आली आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून ते गाव परिसरातच साठविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, या उद्देशाने विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली.
विशेषतः भोर्डी नदीच्या पुनर्जीवनाचे काम या उपक्रमातील महत्त्वपूर्ण काम मानले जात आहे. नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणामुळे परिसरात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत झाली. याचा फायदा शेतीसह परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही सकारात्मक परिणाम झाला आहे. जलसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक विश्वासार्ह जलस्रोत उपलब्ध होण्यास मदत झाली असून भूजलपातळीतही सुधारणा होण्यास हातभार लागला आहे.
जलसंधारणासोबत पर्यावरण संवर्धनावरही भर
केवळ नदी-नाला पुनर्जीवनापुरते कार्य मर्यादित न ठेवता वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनावरही विशेष भर देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही बाबींचा समन्वय साधत गावांच्या भविष्यातील पाणी व पर्यावरणाच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.
जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीला बळकटी देणे, तसेच वृक्षलागवडीद्वारे पर्यावरणाचा समतोल राखणे, या कामांमुळे ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सामाजिक कार्याची दखल
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलसंधारणाच्या माध्यमातून त्यावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी भाऊसाहेब घुगे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली. नदी-नाला पुनर्जीवन, जलसाठा निर्मिती, वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून समाजहितासाठी सुरू असलेल्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना ‘जलक्रांती योद्धा’ पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भाऊसाहेब घुगे यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. जलसंधारणाचे हे कार्य पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या पुरस्कारामुळे जालना जिल्ह्यात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना तसेच संस्थांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार