बदनापूर पोलीसांचा तपास फळाला ; कारफोडीतील सहा लाख रुपये जप्त

बदनापूर पोलिसांची आंध्र प्रदेशात कारवाई; आरोपींचा शोध सुरू

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना/दशरथ वाकोडे : बदनापूर शहरातील SBI बँकेतून १० लाख रुपये काढून कारमधून जात असलेल्या व्यक्तीच्या वाहनाचा पाठलाग करून कारची काच फोडत सहा लाख रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींचा बदनापूर पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी आंध्र प्रदेशात जाऊन आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेली सहा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

बँकेतून काढून कारमध्ये ठेवलेली रोकड चोरट्यांनी कारची काच फोडून लंपास केल्याच्या प्रकरणाचा बदनापूर पोलिसांनी छडा लावला आहे. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली असून, आंध्र प्रदेशातील आरोपीच्या घरातून चोरीस गेलेली सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बदनापूर येथील SBI बँकेतून ४ सप्टेंबर २०२६ रोजी विष्णु कुंडलीकराव कोल्हे (वय ४९, रा. धोपटेश्वर, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी १० लाख रुपये काढले होते. ही रक्कम घेऊन ते कारमधून जात असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

Indian_Fast

धोपटेश्वर ते देवगाव रोडवरील शिवारात कोल्हे यांनी कार उभी करून शेतात गेल्यानंतर चोरट्यांनी कारच्या मागील दरवाजाची काच फोडली आणि कारमधील रोकड घेऊन पोबारा केला. काही वेळाने परत आल्यानंतर कारची काच फुटलेली आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दोन तपास पथके तयार केली. पथकाने परिसरातील CCTV फुटेज तपासण्यासोबतच तांत्रिक तपास केला. या तपासात मोटारसायकलवरून दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून काच फोडत रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान गुंजी चालराजु जबराज आणि गुड्डेटी विनोत प्रभुदास, दोघेही रा. कपरला टिपा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश, यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना झाले. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, तपास पथकाने आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेली सहा लाख रुपयांची रोकड जप्त केली. उर्वरित रक्कम आणि अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तपास पथक पुढील कारवाई करत आहे.

ही कारवाई जालना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक एस. आर. कुकलारे, पोहेकॉ/६७१ ए. एस. दासर, पोको/२२७ भडंगे, पोको/३४२ पी. के. गोलवाल आणि पोको/१६९९ एस. जे. तडवी यांनी सहभाग घेतला.

प्रतिनिधी

संबंधित समाचार