निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १४ जुगाऱ्यांवर कारवाई
निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड १४ जुगाऱ्यांवर कारवाई; जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व वाहनांसह २५ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना, प्रतिनिधी : निधोना शिवारात चोरून-लपून सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर जालना पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांच्या पथकासह चंदनझिरा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत एकूण १४ जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह तब्बल २५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
जुगार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक तसेच पोलीस अधीक्षक यांचे पथक गस्तीवर असताना निधोना शिवारात काही व्यक्ती चोरून-लपून मोठ्या पैशांच्या आमिषाने झन्नामन्ना व तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि सहायक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहताच पळापळ पोलिसांचे पथक जुगार अड्ड्यावर पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. कारवाईच्या भीतीने काही जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून काही जणांना जागेवरच ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विजय लक्ष्मणराव पुंगडवाले (रा. निधोना), राहुल विश्वनाथ शहापुरकर (रा. निधोना), शेख मोसीन शेख इक्बाल (रा. गांधीनगर, जालना), अमजद रफिक सय्यद (रा. गांधीनगर, जालना), विजय कैलास खरे (रा. कन्हैय्यानगर, जालना), सुनिल संतुकराव दाभाडे (रा. थिगळखेडा), समिर जफर खान (रा. संजयनगर, जालना) आणि महेंद्र अशोक आदमाने (रा. निधोना) यांचा समावेश आहे.
सहा जण फरार
पोलिसांच्या कारवाईदरम्यान काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इसा शेख, समिर पटेल, सुनिल शेजुळ, सुनिल म्हस्के (रा. निधोना), विक्की (रा. हिंदनगर, जालना) आणि संचिन मंडल (रा. ढवळेश्वर) हे फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
२५ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच विविध वाहने असा एकूण २५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे या कारवाईमुळे अवैध जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे.
चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस कर्मचारी सागर खैरे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जोहरसिंग कलाणी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख, सफौ दिनेश बरडे, मनसुब वेताळ, पोहेकॉ सचिन कोकणे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, विजय बहुरे, तसेच पोकॉ सागर खैरे, नंदकिशोर जैवाळ, हरी जाधव, गोवर्धन हरबक, विशाल हळदे, मतीन पठाण आणि कारभारी नागवे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
निधोना शिवारातील या कारवाईमुळे अवैध जुगार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Help