नंदापूरच्या वैभवात भर पडणार; भव्य भारत माता मंदिराचा २८ सप्टेंबरला लोकार्पण सोहळा
ह. भ. प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून मंदिराची उभारणी ; समृद्धी महामार्गालगत नंदापूरला नवी ओळख
जालना/ दशरथ वाकोडे : द्राक्ष उत्पादनासाठी एकेकाळी जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या नंदापूर गावाच्या वैभवात आता आणखी एका महत्त्वपूर्ण वास्तूची भर पडली आहे. गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या भव्य भारत माता मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ३.४५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य-दिव्य भारत माता मंदिरामुळे नंदापूर गावाची एक वेगळी ओळख निर्माण होत असून, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा संदेश देणारे हे मंदिर परिसराचे आकर्षण ठरणार आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयुजी जोशी तसेच जालना येथील उद्योजक घनशामजी गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नंदापूर हे गाव द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखले जाते. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेत असून, कृषी क्षेत्रात गावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यातच आता भारत माता मंदिराची भव्य वास्तू उभी राहत असल्याने नंदापूरच्या ओळखीत आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
विशेष म्हणजे भारत माता मंदिर हे समृद्धी महामार्गापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सहज नजरेत हे मंदिर भरणार आहे. भव्य स्वरूपातील भारत माता मंदिरामुळे नंदापूरकडे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जाणार असून, भविष्यात हे मंदिर गावाचे प्रमुख आकर्षण आणि एक वेगळी ओळख ठरण्याची शक्यता आहे.
भारत माता मंदिराच्या माध्यमातून केवळ धार्मिक भावना जोपासण्याबरोबरच देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकडे नंदापूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांकडून उपस्थितीचे आवाहन
लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात विविध तयारी करण्यात येत असून, नंदापूर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास नंदापूर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, नंदापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
“जय भारत माता की जय” या जयघोषात होणारा हा लोकार्पण सोहळा नंदापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Help