लखन तुरे हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना घाणेवाडी शिवारातून अटक

चंदनझिरा पोलिसांची मध्यरात्री थरारक कारवाई; चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना, प्रतिनिधी : जालना शहरातील लखन छगनलाल तुरे (वय ३८, रा. संभाजीनगर) यांच्या हत्या प्रकरणातील गेल्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड या दोघांना राजूर रोडवरील घानेवाडी शिवारातील एका शेतातून मध्यरात्री नाट्यमयरीत्या ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे लखन तुरे हत्या प्रकरणातील चारही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून लखन तुरे यांच्यासोबत चौघांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. चौघांनी लखन तुरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यासोबतच सिमेंटच्या गट्टूने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात लखन तुरे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दि. ७ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मारहाणीच्या घटनेचे रूपांतर हत्या प्रकरणात झाले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ
घटनेनंतर प्रकरणातील शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड हे दोघे जालना शहरातून पसार झाले होते. आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर त्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना चंदनझिरा पोलिसांना दिल्या. त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी आरोपींच्या मागावर राहून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व शिर्डी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, बीड जिल्ह्यातील गेवराई, तसेच जालना जिल्ह्यातील अंबड आदी विविध ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घ्यावा लागला.
घानेवाडी शिवारात सापळा
दरम्यान, दि. ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना शुभम जोगदंड आणि किशोर जोगदंड हे राजूर रोडवरील घानेवाडी शिवारातील एका शेतात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांच्या पथकाने कोणताही विलंब न करता घानेवाडी शिवार गाठले. परिसराची पाहणी करून पोलिसांनी शेताभोवती सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देवीदास जोगदंड या दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या हत्या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. फरार असलेल्या उर्वरित दोन आरोपींनाही अटक झाल्याने आता या गुन्ह्यातील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत पोलिसांकडून हत्येच्या घटनेमागील नेमके कारण, पैशांच्या देवाणघेवाणीचा वाद कशामुळे झाला, हल्ल्यात कोणाची कोणती भूमिका होती, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तू व इतर बाबींचा तपास केला जाणार आहे.
पैशांच्या व्यवहारातून वादाचे पर्यवसान हत्येत
प्राथमिक तपासात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून लखन तुरे यांच्यावर हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या वादामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि हल्ल्याचे कारण काय होते, याचा सखोल तपास चंदनझिरा पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सलग तीन दिवस विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवून अखेर त्यांना जालना शहराजवळील घानेवाडी शिवारातून अटक केल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे करीत आहेत.

प्रतिनिधी

संबंधित समाचार