मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडा; संधींच्या अवकाशात भरारी घ्या : राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर
परतूरला ३२ वर्षांनंतर युवक महोत्सवाचे यजमानपद
परतूर, दि. ७ : आजच्या तरुणाईसमोर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. मात्र, मोबाईलच्या स्क्रिनवरील आभासी जगात अडकून न राहता प्रत्यक्ष जगातील संधी ओळखून युवकांनी आपल्या भविष्याला आकार द्यावा. संधींचे प्रचंड अवकाश तरुणांना खुणावत असून त्यात भरारी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन यंदा परतूर येथे करण्यात आले आहे. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी हा महोत्सव होत आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर परतूरला युवक महोत्सवाचे यजमानपद मिळाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवा शक्ती देशाची खरी ताकद
मेघनाताई बोर्डीकर म्हणाल्या, युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे. तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. युवक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. विशेष म्हणजे यंदा महोत्सवात विद्यार्थिनींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ही समाधानाची बाब आहे. या महोत्सवातून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कलावंत घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Help