जालना शहरात मोटारसायकलचे सुटे भाग काढताना दोघांना पकडले; 45 हजारांची दुचाकी जप्त

सदर बाजार पोलीसांची कारवाई

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना शहरातील कन्या प्रशाळेच्या पाठीमागील बाजूस अंधारात मोटारसायकलचे सुटे भाग काढत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे आढळून आलेली सुमारे 45 हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. आदित्य आनंद नवगिरे (वय 22, रा. क्रांतीनगर, जालना) आणि जय अशोक उदावंत (वय 23, रा. सुवर्णकारनगर, जालना) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना खबर्‍यामार्फत कन्या प्रशाळेच्या पाठीमागील भिंतीजवळ अंधारात दोन जण मोटारसायकलचे सुटे भाग काढत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवून संबंधित ठिकाणी धाव घेतली. रात्री सुमारे आठ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता दोन तरुण मोटारसायकलचे सुटे भाग काढताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यापैकी एक जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव आदित्य आनंद नवगिरे असल्याचे सांगितले. घटनास्थळी असलेल्या दुसर्‍या तरुणाचे नाव जय अशोक उदावंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता दोघांनाही वाहनाच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. तसेच वाहनासंदर्भातील कोणतेही कागदपत्र त्यांनी सादर केले नाही.
पोलिसांनी पंचांसमक्ष मोटारसायकल ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेली होंडा कंपनीची राखाडी रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल असून, तिची अंदाजे किंमत 45 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे या मोटारसायकलला दोन्ही चाके नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलीस शिपाई नजीर अहमद खान गुलाम रसूल खान पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य नवगिरे आणि जय उदावंत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी

संबंधित समाचार