घरातून नेत २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
पीरकल्याण परिसर हादरला
जालना, प्रतिनिधी (दशरथ वाकोडे) : जालना तालुक्यातील पीरकल्याण येथे शुक्रवारी (दि. 29) घडलेल्या एका निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अतुल सिमुन आघाम (वय 22) या तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या करण्यात आली. हल्ला इतका क्रूर होता की अतुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीरकल्याण येथील रहिवासी असलेल्या अतुल आघाम याला काही आरोपींनी घरातून बोलावून नेले. त्यानंतर त्याला गवळी पोखरी शिवाराच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्यात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आरोपींनी अतुलवर एकामागून एक वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी अतुल जखमी अवस्थेत गावाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे तो काही अंतरावरच कोसळला. त्यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्यावर पुन्हा वार केल्याचे सांगितले जात आहे. या भीषण हल्ल्यात अतुलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या हत्येमुळे पीरकल्याण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्युदेह रात्रीच पीएमसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविला असुन पोलीसानी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वादातून अथवा वैयक्तिक कारणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून दोन संशयितांचा अटक केली असून रात्री उशीरापर्यत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, तरुण वयात अतुल आघाम याचा झालेला दुर्दैवी मृत्यू गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पोलिस तपास सुरू असून हत्येमागील कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


