गरुड प्रतिमेवर डान्स करून व्हिडिओ व्हायरल करणारा युवक अटकेत

या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Published By Shubh Prabhat
On

जालना, दि. 29 : मोतीबाग चौपाटी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या गरुड प्रतिमेवर चढून डान्स करत व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या युवकाला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कैलास गायकवाड (वय 26, रा. मंगळ बाजार, जालना) याने काही दिवसांपूर्वी मोतीबाग चौपाटी येथील गरुडाच्या प्रतिमेवर चढून डान्स केला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकरणी जालना महानगरपालिकेच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून शुक्रवारी मंगळ बाजार परिसरातून आरोपी दिनेश गायकवाड याला ताब्यात घेतले.

Indian_Fast

सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवी देशमुख आणि सागर खैरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सार्वजनिक मालमत्ता, स्मारके व प्रतिमांचा अवमान करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलिसांनी दिला असून अशा कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

प्रतिनिधी