सदरबाजार पोलीसांनी मस्तगड परिसरात गोवंश वाहतूक पकडली; कत्तलीसाठी नेलेले दोन बैल जप्त

गोरक्षकांनी मस्तगड परिसरात वाहन व चालकाला अडवून ठेवल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

Published By Shubh Prabhat
On

अवैध गोवंश वाहतूक व कत्तल प्रतिबंध पथकाने पहाटेच्या सुमारास कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या दोन गोवंशीय बैलांची सुटका केली. या प्रकरणी चालकास ताब्यात घेण्यात आले असून 5 लाख 67 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी म्हणून संतोष कमलाकर खरात यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जालना येथे अवैध गोवंश वाहतूक व कत्तल प्रतिबंध पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे 2026 रोजी पहाटे 4.54 वाजण्याच्या सुमारास चमडा बाजार परिसरात एका महिंद्रा पिकअप वाहनातून दोन गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. तसेच काही गोरक्षकांनी मस्तगड परिसरात वाहन व चालकाला अडवून ठेवल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

Indian_Fast

यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मस्तगड परिसरात धाव घेतली. तेथे वाहन चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय काशिनाथ पाचरणे रा. पानशेंद्रा, ता. जि. जालना असे सांगितले. त्याने चमडा बाजार येथील मुज्जु कुरेशी यास कत्तलीसाठी जनावरे विक्री केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी चमडा बाजार येथील मशिदीजवळ छापा टाकला असता मोकळ्या जागेत दोन गोवंशीय बैल आढळून आले. त्यामध्ये एक पांढर्‍या रंगाचा खिल्लार जातीचा बैल व एक काळ्या रंगाचा बैल असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत दोन बैल, एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम तसेच महिंद्रा बोलेरो मॅक्सी प्लस पिकअप वाहन असा एकूण 5 लाख 67 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी संजय काशिनाथ पाचरणे तसेच मुज्जु कुरेशी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नोडल अधिकारी सपोनि. सचिन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. बहुरे, पोकॉ. धुमाळ, झोटे, गायकवाड, कुर्‍हाडे, माळगे तसेच इतर पोलिस कर्मचार्‍यांनी केली.

प्रतिनिधी

संबंधित समाचार